सामान्य प्रशासन

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५ नुसार प्रत्येक महानगरपालिका ही “शहराची महानगरपालिका” होय. त्यानुसार पुणे महानगरपालिका ही पुणे शहराची महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. तिची अखंड परंपरा असेल व तिचा एक सामाईक शिक्का असेल. स्थानिक लोकांमधुन लोकप्रतिनिधी निवडून स्थानिक लोकांसाठी व स्थानिक पायाभूत सुविधा व  विकास करणे हा त्याचा मूळ उद्देश असतो.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (सन 1949 चा मुंबई अधिनियम क्र. 59) या अधिनियमाच्या तरतूदीन्वये पुणे महानगरपालिकेचे कामकाज केले जाते.

पुणे महानरगपालिकेचे 1. लोकप्रतिनिधी विभाग व 2. प्रशासकीय विभाग असे दोन विभाग आहेत. लोकप्रतिनिधी विभाग हा निर्वाचित लोकप्रतिनिधींचा असतो व प्रशासकीय विभागात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमान्वये नियुक्त झालेले प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी कार्यरत असतात.

जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची मा. मुख्य सभा (महानगरपालिका सभा) तयार होते. ध्येय व धोरणे ठरविण्याचे काम महानगरपालिका सभेमार्फत केले जाते. सदर सभेचे संचालन व सभा कामकाजावर नियंत्रणाचे काम मा.महापौर यांचे मार्फत केले जाते. मा.मनपासभेशिवाय मा. स्थायी समिती व प्रभाग समित्या,परिवहन समिती,मा.महापौर हे  सक्षम प्राधिकारी म्हणून काम करतात. या शिवाय शहर सुधारणा समिती, महिला व  बाल कल्याण समिती, विधी समिती,क्रिडा समिती, नाम समिती इत्यादी समित्या, विविध खात्यांच्या प्रस्तावास मंजूरी देण्याचे काम पाहतात.

स्थानिक नागरीकांना ते रहात असलेल्या ठिकाणापासून जवळ असलेले कार्यालयातून सर्व प्रकारच्या लोकसेवा व इतर सेवा सुविधांची उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुणे महानगरपालिका हद्दीत एकूण 15 क्षेत्रीय कार्यालय स्थापित करण्यात आली आहेत. महापालिका सहाय्यक आयुक्त हे या क्षेत्रीय कार्यालयाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असतात. सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या कामकाजवर नियंत्रणासाठी एकूण 4 परिमंडळ विभाग कार्यरत आहेत. उप आयुक्त दर्जाचे अधिकारी हे परिमंडळ विभाग तसेच् क्षेत्रिय कार्यालयाचे खाते प्रमुख म्हणून कार्यरत असतात.

पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील जी पदे सरळ सेवेची आहेत अशी पदे रिक्त असल्यास, ती पदे भरण्यासाठी पुणे महानगरपालिका सेवा (सेवाप्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम 2014मधील तरतूदीनुसार पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येते. पद भरतीसाठी स्थानिक वर्तमानपत्रात व मनपाच्या संकेतस्थळावर जाहिरात देण्यात येते.

पुणे महानगरपालिका सेवा (सेवाप्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम 2014 पुणे मनपा च्या https://pmc.gov.in/en या संकेतस्थळावर पहाण्यासाठी उपलब्ध आहे.

पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील जी पदे बढतीची आहेत अशा पदांवर संबंधित सेवकांना सेवाजेष्ठतेने, गुणवत्ता व पात्रतेच्या आधारे पुणे महानगरपालिका सेवा (सेवाप्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम 2014 मधील तरतूदीनुसार पदोन्नती दिली जाते.

महापालिका आयुक्त हे प्रशासकीय विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त, अनुक्रमे विशेष, जनरल व इस्टेट या स्वतंत्र पदावर नियंत्रक अधिकारी म्हणून कार्यरत असतात. या तीन अधिका-यांकडे महानगरपालिकेची विविध खाती विभागून देण्यात आली आहेत. या सर्व खात्यांचे खातेप्रमुख व तेथील संपूर्ण कामकाजावर अतिरिक्त महापालिका आयुक्त यांचे नियंत्रण असते. खात्यांच्या खातेप्रमुखांकडे त्यांच्या अखता-यातील सर्व उप विभागातील संपूर्ण कामकाज व आस्थापना विषयी बाबीचे अंमलबजावणी व नियंत्रणाचे काम असते.

लोकप्रतिनिधी विभागामार्फत धोरणे ठरविणे व धोरणास मान्यता देणे व आर्थिक बाबींस मान्यता देणेचे काम केले जाते तर प्रशासकीय विभागामार्फत धोरणांची अंमलबजावणी व कायद्यातील विविध तरतूदींची अंमलबजावणी करण्याचे काम केले जाते.